जत : (जनक्रांती न्युजनेटवर्क) येथील साळमाडगेवाडी (ता. जत) येथे भाजीपाल्याच्या पिकामध्ये बेकायदा गांजाची लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकून 12 लाख 85 हजार किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 128 किलो ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाची लागवड करणार्यास अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा जत पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी संजय प्रभाकर गिरीबुवा (वय 48, रा. साळमाळगेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
जत तालुक्यातील साळमाडगेवाडी येथे एका शेतात गांजाची लागवड केल्याची जत पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली होती. पोलिसांनी पथक तयार करुन गुरुवारी रात्री गिरीबुवा यांच्या शेतात छापा टाकला. दरम्यान भाजीपाल्यामध्ये लागवड केलेली 6 ते 8 फुटाची गांजाची ओली झाडे दिसली.
पोलिसांनी सर्व गांजाची झाडे जप्त केला असता त्याचे वजन 128 किलो 503 ग्रॅम भरले. त्याची बाजारभावानुसार किंमत 12 लाख 85 हजार 40 रुपये होते. याप्रकरणी गिरीबुवा याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार बेकायदा औषधी द्रव व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची फिर्याद उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे. कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलिस नाईक राजेंद्र सावंत, विनोद सकटे, विक्रम घोदे, तोहिद मुल्ला, सुभाष काळे, नवनाथ करांडे यांनी सहभाग घेतला होता. याप्रकरणी सहाय्यक निरीक्षक बिरप्पा लातुरे अधिक तपास करत आहेत.
जत पोलिसांनी केलेल्या ह्या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
