
मुंबई – (जनक्रांती न्युजनेटवर्क):
समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था व डिजी लोन आदी प्रश्नांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज सभागृहात आज आक्रमक दिसले.
पोलिसांच्या ड्युटीचा ८ तासांचा कालावधी असला तरीही किमान १२ तास त्यांना काम करावे लागते. मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक पोलिस मुंबईबाहेर वास्तव्यास आहेत. वसई, विरार, नवी मुंबई, पनवेलपासून कर्जत, कसारापर्यंत पोलिसांचे वास्तव्य आहे. यामुळे दिवसातील किमान १६ ते १८ तास त्यांचे ड्युटी व प्रवासात जातो हा प्रमुख मुद्दा त्यांनी मांडला .
योगा आणि व्यायाम करण्यासाठी पोलिसांना वेळ मिळत नसल्याने आकडेवारीनुसार सर्वाधिक पोलिसमृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली.
पोलिसांच्या मूलभूत सुविधांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही.पोलिसांच्या शासकीय घरांची दुरावस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून त्यांना डीजी लोन मिळत नाही. आगामी काळात राज्य सरकार या सर्व विषयांवर धोरण आखणार आहे का? असा प्रश्न दानवे यांनी सरकारला विचारत पोलिसांच्या प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले.
मुंबईत पोलिसांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे नूतनीकरण होणार आहे. तसेच डिजी लोनचे प्रलंबित अर्ज निकाले काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना दिले.