
मुंबई ( जनक्रांती न्युजनेटवर्क):
वाहतूकदार संघटनांच्या विविध मागण्यांबाबत आज विधानभवन, मुंबई येथे परिवहनमंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, या बैठकीस राज्यमंत्री कदम उपस्थित होते. मुंबईतील खासगी बसेस संदर्भात अनेक अडचणी आहेत. बसेसची पार्किंग व्यवस्था, बस थांब्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आजची बैठक पार पडली.
मुंबई शहरात सध्या दररोज १० हजारांपेक्षा अधिक खासगी वाहतूक करणाऱ्या बसेस कार्यरत आहेत. या बसेसच्या पार्किंगचा प्रश्न महत्त्वाचा आहे तसेच बस मध्ये प्रवेश करणे व उतरण्याचा थांबा अशा संबंधित सोयी सुविधांबाबत आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सुचवले असून राज्यमंत्री योगेश कदम यांनी याबैठकीत ट्रान्सपोर्ट पार्किंग हब निर्माण करण्यासाठी आवश्यक जागेची निश्चिती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी गृह, नगरविकास व परिवहन विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. शहराच्या आराखड्यात ट्रान्सपोर्ट पार्किंग हबसाठी आरक्षित जागाचे तरतूद करण्यात यावी असे देखील त्यांनी याबैठकीत नमूद केले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (गृह) श्री. इकबाल सिंह चहल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार
अप्पर पोलीस महानिरीक्षक (वाहतूक) श्री. प्रवीण साळुंखे, सह पोलीस आयुक्त (वाहतूक), मुंबई श्री. अनिल कुंभारे, पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस) श्री. सुनील भारद्वाज तसेच विविध वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ करणे आणि खासगी बस वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हा शासनाचा प्राथमिक हेतू असून, लवकरच या दिशेने ठोस पावले उचलण्यात येतील. असं देखील राज्यमंत्री योगेश कदम यावेळी म्हणाले.
ह्या बैठकीतुन नेमकं काय साध्य झालं हे येत्या काळात स्पष्ट होईल.