
सांगली : येथील आटपाडी तालुक्यातुन एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षक वडिलाने मुलीला मारहाण करून तिचा खून केला आहे. मुलीला नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले होते, या रागातून वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. आटपाटी तालुक्यातील नेलकरंजी इथं हा संतापजनक प्रकार घडला आहे. धोंडीराम भोसले असं मुलीला मारहाण करणाऱ्या वडिलाचं नाव आहे. तर साधना असं मुलीचं नाव आहे. या घटनेमुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नेलकरंजी या ठिकाणी धोंडीराम भोसले याचं कुटुंब राहत होते, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. धोंडीराम भोसले हा नेलकरंजीमधील शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे, तर त्याची पत्नी प्रीती भोसले त्याच गावच्या माजी सरपंच होतेया.
मुलगी साधना ही आटपाडी मधल्याच एका निवासी महाविद्यालयात बारावीचं विज्ञान शाखेचं शिक्षण घेत होती. साधनाला 10 वीत 92.60 टक्के गुण मिळाले होते. अशा स्थितीत मुलीला डॉक्टर बनवण्याचं संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न होतं. यामुळे मेडिकल प्रवेशासाठी साधनानं नीटचा अभ्यासही सुरू केला होता मात्र ती ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती, त्याच ठिकाणी नीट सराव परीक्षेच्या सरावासाठी परीक्षा घेण्यात आली, ज्यामध्ये तिला कमी गुण मिळाले होते. नीट ला कमी मार्कस मिळाल्याचे समजताच शिक्षक असलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विशेष म्हणजे, घटनेच्या दोन दिवस आधीच साधना नेलकरंजीतील आपल्या घरी आली होती. यावेळी वडील धोंडीराम भोसले यानं मुलीला कमी गुण कसे मिळाले? यावरुन जाब विचारायला सुरुवात केली. यादरम्यान तिने तुम्हाला देखील कमी गुण मिळत होते, तुम्ही कुठे कलेक्टर झाला, शिक्षकचं झालात ना? असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे चिडलेल्या धोंडीराम भोसले यानं घरातीलच लाकडी खुंट्यानं साधनाला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा मुलीच्या आईनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यानंतर पुन्हा तासाभरानं धोंडीराम भोसले यानं मुलीला मारहाण केली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.
“परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी मुलीला मारहाण केली होती. रुग्णालयात उपचारावेळी तिचा मृत्यू झाला, अशी तक्रार मुलीच्या आईनं दिली होती , सदर तक्रारीत्यानुसार वडिलांना अटक केली असून, पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. “ – विनय बहिरे – पोलीस निरीक्षक, आटपाडी
